स्वदेसमधील चरणपूर
December 2, 2006
या फोटोमधील घाट कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतो आहे ना? ..ही नदी……..हे मंदिर.
नक्की कुठेतरी पाहिली आहे ही जागा! ………पण कुठे?
अहो……हे तर स्वदेस मधले “चरणपूर”! आता आठवले ना तुम्हाला…..
या गावाचे खरे नाव “मेणवली”. वाई पासून धोम धरणाकडे जायला लागले की अवघ्या ४-५ कि. मी. वर मेणवली लागते, अगदी छोटेसे टुमदार गाव. नाना फडणीसांनी १८व्या शतकात इथे एक मोठा वाडा, घाट आणि मेणेश्वराचे व विष्णुचे मंदिर बांधले. एका बाजुला खंबीरपणे उभा असलेला पांडवगड तर दुसऱ्या बाजुला पाचगणीला घेऊन जाणारा पासरणीच्या घाटाचा रस्ता, आणि त्या दोघांमधून वाहणारी कृष्णा नदी. कृष्णेवर बांधलेला हा घाट पाहिला की मेणवलीच्या प्रेमातच पडायला होते. इथली शांतता आणि निवांतपणा मनाला एका क्षणात भावतो.
नाना फडणीसांच्या वाडयाला मोठे ऎतिहासिक महत्व देखिल आहे. त्याचे कारण इथे मिळालेले पेशवेकालीन कागदपत्रे आणि दस्तावेज. नाना फडणीसांच्या वेळेपासून जतन केलेल्या या कागदपत्रांना इतिहासकार “मेणवलीचे दफ्तर” असे म्हणतात. घाटावर चिमाजीअप्पांनी वसईच्या पोर्तुगीजांविरुद्धच्या विजयानंतर आणलेली एक पंचधातूची मोठी घंटा आहे. अशीच अजुन एक घंटा तुम्ही थेऊरच्या अष्टविनायक गणपती मंदिरात नक्की बघितली असेल. त्याव्यतिरीक्त वाड्यामध्ये असलेली तैलचित्रे पण खूप सुंदर आहेत. मेणवलीचे आणखी एक महत्व म्हणजे १९४२ च्या “भारत छोडो” आंदोलनच्या वेळेस नानासाहेब पाटिलांनी स्थापन केलेले “पत्री सरकार” पण आपल्या कारभारासाठी मेणवली गावाचा वापर करायचे.
पण सध्याच्या काळात मेणवली गाजते आहे ते बॉलिवुडवाल्यांमुळे. स्वदेसच्या आधी इथे सर्जा, युद्ध, जिस देस मे गंगा रेहता है, गंगाजल, मृत्युदंड आणि गूंज उठी शहनाई या चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे, तर संजय लीला भंसाळींचा “बाजीराव-मस्तानी” व हॉलिवुडचा “द ईंव्हेडर” या इंग्रजी चित्रपटाचे काम पण इथेच होणार आहे.
महाबळेश्वर-पाचगणीच्या वाटेवर, वाईहून अगदी दहा मिनीटांच्या रस्त्यावर असलेले मेणवली हा कृष्णेच्या काठावरचा कराडसारखाच अजुन एक दागिना.
( फोटोमध्ये उजवीकडचे मंदिर मेणेश्वराचे तर डावीकडे पाठीमागे असलेले मंदिर विष्णुचे आहे. )
माहिती व छायाचित्रांसाठी या संकेतस्थळांचे आभार.
१) http://ramrao2.tripod.com/Menavali.html
२) http://outdoors.webshots.com/photo/1528797560074388040QxBXii

