रामन – अल्कोहोल इफ्फेक्ट!
April 12, 2007

नोबेल पारितोषिक वितरणानंतर चंद्रशेखर वेंकट रामन यांना एका पार्टीमध्ये दारु घेण्याचा आग्रह करण्यात आला होता. त्यावर ते मिस्किलपणे म्हणाले ‘तुम्ही अल्कोहोल वर रामन इफ्फेक्ट बघितला आहात, पण कृपया रामन वर अल्कोहोल इफ्फेक्ट बघू नका!‘ रामन इफ्फेक्ट हा organic liquids वरील light scattering वर आधारित असल्यामुळे उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकली.
अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे रामन यांना त्यांच्या संशोधनावर येवढा विश्वास होता की त्यांनी स्वीडनमधील नोबेल पारितोषिक समारंभासाठीचे तिकीट त्यांना पारितोषिक मिळाल्याचे घोषीत होण्याच्या जवळजवळ एक वर्ष आधी काढले होते!
रामन इफ्फेक्ट व्यतिरीक्त त्यांनी अजूनही अनेक विषयांवर संशोधन केले होते. तबल्यावर काळा शाईचा डाग असल्यामुळेच त्यातून harmonics निर्माण होतात हे देखिल त्यांनी दाखवले. ड्रम्स व तबल्यामध्ये त्यामूळेच मूलभूत फरक असतो.
बिल गेटस विरुद्ध स्टीव्ह जॉब्स!
April 6, 2007

मध्यंतरी एक मस्त चित्रपट पाहिला….’Pirates of the Silicon Valley’. नविन महितीचा दरवाजा एकदम उघडला की कसे होते ना ………….तसे झाले काहीतरी. तेव्हापासून रोज इंटरनेटवर Steve Jobs आणि Bill Gates संबंधीत माहिती शोधायचे वेडच लागले आहे.
हा चित्रपट Microsoftचा बिल गेटस आणि Apple चा स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवनावर आणि त्यांच्यामधील स्पर्धेवर आधारित आहे. मुख्य म्हणजे पात्रांची व सर्व वस्तवातील संदर्भांची नावे जशीच्या-तशी ठेवली आहेत …जसे Machintosh, Windows वगैरे. त्यामुळे चित्रपट पाहतानाच आपण नकळत आपल्या आवती भवतीच्या गोष्टींशी त्याचा संबंध लावायला लागतो. चित्रपटची सुरुवात स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेटस यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून होते. पण कथेतील मुख्य विषय हा Apple आणि Microsoft मधील स्पर्धा आहे!
Mouse चे तंत्रज्ञान सर्वात पहिल्यांदा Xerox च्या प्रयोगशाळेने शोधले होते म्हणे. पण दूर्दैवाने त्यांच्या सा.मो.सा.ला (साहेबाच्या मोठ्या साहेबाला) तो प्रकार काय आहे हे झेपलेच नाही आणि त्यांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले. मग ते तंत्रज्ञान Xerox कडून Steve Jobs ने विकत घेतले आणि Machintosh बाजारात आणला. बिल गेटस तेव्हा IBM च्या PC साठी Operating System तयार करत होता. त्याने मग स्टीव्ह जॉब्सला हरब-याच्या झाडावर चढवले आणि Apple कडूने हे तंत्रज्ञान चक्क चोरले!!..Now can you beat that? आपण जे Windows रोज वापरतो किंवा आत्ता तुम्ही हा लेख ज्या Windows Operating System च्या मदतीने बघताय त्याचा उदय या चोरीमधून झाला आहे म्हणे!! ( आणि वर हे लोक अशिआयी देशांमध्ये पायरसी चालते म्हणून आरडा ओरडा करत असतात.)
चित्रपट स्टीव्ह जॉब्सवरतीच केंद्रीत आहे. त्यामुळे त्याची आवड-निवड, सवयी, विचित्र वागणे इत्यादी कलाकाराने खूप छान वठवले आहे. सर्वांनी हा चित्रपट जरूर बघवा व ज्या लोकांना स्टीव्ह जॉब्सबद्दल माहिती आहे, त्यांना हा चित्रपट विशेष आवडेल व तो बघून झाला की झपाटलेल्या माणसासारखे नेटवर त्याच्यासंबंधी माहिती शोधतील.
असंच काल स्टीव्ह जॉब्स आणि Apple वरती शोधले असता Apple-Machintosh च्या जाहिरातींचा हा संग्रह मिळाला. संगणकाला मानवरुप देऊन Apple ने खूप दर्जेदार जाहिरात केली आहे. मला सर्वात जास्त आवडली ती त्यातील PC, Mac आणि जपानी कॅमेराची जाहिरात!
पण अगदी आवर्जून बघावे ते स्टीव्ह जॉब्सचे हे भाषण.
परंतू, दुस-या बाजूने विचार केला तर असे दिसते, की स्टीव्ह जॉब्स ने मायक्रोसॉफ्ट विरुद्ध खूप प्रचार केला. Windowsचे पहिले काही व्हर्जन्स Machintosh वरून छापले असतील असे जरी मानले…तरीपण त्यानंतरचा विकास हा त्यांनी स्वतःहून केला आहे. शिवाय Apple ने सुद्धा सगळे काही स्वतःहून थोडीच विकसीत केले आहे. त्यांना पण Xerox ची मदत घ्यावीच लागली ना. पण म्हणून मायक्रोसॉफ्टने कधी ऍपल विरुद्ध अशी जाहिरातबाजी केल्याचे ऐकीवात नाही! नेटवर शोध घेतल्यास, स्टीव्ह ने नेहमी मायक्रोसॉफ्ट वर तोंडसूख घेतले आहे, पण बिल गेटसने असे कधी जाहिरपणे नाही केले..(उदारणार्थ ह्या दोन मुलाखती: स्टीव्ह आणि बिल गेटस.)
अर्थात स्टीव्ह जॉब्सचे वक्तृत्व मात्र वाखण्याजोगे आहे. १९८३ साली Machintosh बाजारात आला तेव्हाचे स्टीव्हचे हे भाषण आणि जाहिरात जरुर बघावी!
सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे, Appleचे काही शेअर सध्या मायक्रोसॉफ्टच्या मालकीचे आहेत! शेवटी काय हो, सर्व काही धंदा या शब्दाखाली मोडते…आणि आजच्या स्पर्धेच्या जगात कोणी ना कोणी “ध” चा “मा” हा करणारच! मग तो स्टीव्ह जॉब्स असो वा बिल गेटस…………
(वरील विचार हे लेखकाचे वैयक्तीक विचार असून, या लेखामध्ये कोणा विरुद्ध अपप्रचार करायचा कोणताही हेतू नाही.)
(व्हिडिओज च्या संकेतस्थळांसाठी Youtube चे विशेष आभार!)
भीमरूपी महारुद्रा…..
April 3, 2007
काही विशेष वाक्यांचे किंवा शब्दांचे आपल्या आठवणींशी इतके अतूट बंधन असते, की ते शब्द ऐकताच आपण त्या आठवणींच्या विश्वात रमून जातो. हनुमान जयंती माझ्या मनात अशाच काहीशा आठवणी घेऊन येते. लहानपणीच्या मसूरमध्ये घालवलेल्या दिवसांच्या आठवणी….
मसूर….कराड शहराजवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेले एक खेडं! लहानपणाची काही सुंदर वर्षे मी या ठिकाणी घालवली. मसूरचा इतिहास मात्र खूप जुना….जगदाळेंचे हे देशमुखीचे गाव. जगदाळे आणि आफळे ही मसूरची “पेटंटेड” आडनावे म्हणावी लागतील. पण मसूरला ख-या अर्थाने वेगळेपण आले ते रामदास स्वामींनी आकरा मारुतीं मंदिरांपैकी एक मंदिर मसूरमध्ये बांधल्यामुळे. छोटेखानी मंदिर..त्यासमोर सारवलेले आंगण…एकदम साधासुधा थाट. मारुतीची शेंदूर लावलेली मोठ्ठी मूर्ती.
रामदासी पंथातील शेंबेकर गुरुजी मसू्रच्या मारुती आणि राम मंदिराची व्येवस्था बघायचे. त्यांना आम्ही सगळी मुले ‘शेम्बेकरबुवा‘ किंवा ‘रामदासी काका‘ म्हणायचो. शेंबेकरबुवा आम्हा सर्व मुलांची दर रवीवारी सकाळी शिकवणी घ्यायचे. पण ही एक अगदी वेगळी शिकवणी होती. रामदास स्वमींनी “मनाचे श्लोक” मध्ये सांगितलेला उपदेशच ते आम्हाला अगदी सोप्या भाषेत आणि उदाहरणे देऊन सांगायचे. त्यांची शिकवण्याची पध्दत खूप निराळी होती…ते आम्हा मुलांमध्ये अगदी आमच्या वयाचे होत असतं….त्यामुळे सर्व मुलांची रामदासी काकांशी एकदम छान मैत्री असे. काहीही झाले तरी आम्ही दर रवीवारची राममंदिरातील शिकवणी कधीही चुकवायचो नाही. ऎन बाजारपेठेत असलेले मसूरचे राममंदिरसुद्धा खूप छान होते.
हनुमान जयंतीच्या दिवशी तर मसूरमध्ये दंगाच असायचा. मारुती मंदिरासमोर मोठा मंडप उभारलेला असे. सकाळी अगदी भल्या पहाटे सगळे जण तेथे जमायचे. पुजा…आणि त्यानंतर रामदासी काकांचे त्यांच्या खास शैलीत किर्तन असायचे. मग आम्ही सगळी बच्चेकंपनी त्यांच्याबरोबर गावभर भिक्षा मागायला जायचो. प्रत्येक घरासमोर उभेराहून मोठ्या आवाजात “जय जय रघुवीर समर्थ” म्हणायला काय धमाल यायची! पहाटे सुरु झालेला हा कार्यक्रम दुपारपर्यंत चालायचा. मग परत दुपारी मारुतीमंदिरात यायचे…. जेवणावर आडवा हात मारून आम्ही सर्वजण अखेरीस घरी परतायचो.
मसूरहून पुण्याला मुक्काम हलवला तेव्हा खूप वाईट वाटले होते. पण तेव्हा माझ्या खेडवळ लहान मनाला पुण्याच्या शहरी जीवनाचे खूप कौतुक होते. त्यामुळे पुण्यात रमायला जास्त वेळ लागला नाही. पण इतकी वर्षे होऊनसुद्धा कधीकधी मन मसूरच्या वाटेला आपसूक जातेच. मध्ये एकदा शेंबेकरबुवा पुण्याला घरी आले होते. पण त्यांनंतर त्यांची कधी भेट झाली नाही…….
“समर्थाचीये सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे?”…………